पुणे, : भारतीय टपाल खात्याच्या पुणे क्षेत्रातील 10 विभागांच्या मागील वर्षातील कार्याच्या संदर्भात पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 18 जून 2024 रोजी श्री किशन कुमार शर्मा, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये हेही मंचावर उपस्थित होते.
या समारंभामध्ये पार्सल सेवेचा सर्वोत्तम व्यवसाय, पोस्टल लाईफ इन्शुरन्स चा सर्वोत्तम व्यवसाय, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँकेची सर्वात जास्त खाती उघडणे, जनतेमध्ये मिसळून व मेळाव्यामध्ये सर्वोत्कृष्ट व्यवसायिक उत्पादकता दर्शविणे, सर्वात जास्त आधार अपडेशन आणि बाल आधार कार्ड तयार करणे इत्यादि क्षेत्रातील गुणवंतांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. पुणे क्षेत्रातील 10 विभागांच्या कामगिरी संदर्भात केलेल्या दोन गटामध्ये दोन फिरते चषक प्रदान करण्यात आले. सन 2023-24 या आर्थिक वर्षात उत्तम कामगिरी साठी पुणे शहर पश्चिम विभाग आणि श्रीरामपूर विभागांना हे फिरते चषक देऊन पुरस्कृत करण्यात आले.
या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील जसे की ई कॉमर्स,इन्शुरन्स कंपन्या, देश विदेशात एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आणि मोठ्या कॉर्पोरेट ग्राहकांसाठी विशेष माहिती पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, देश व परदेशात पाठवण्यासाठीच्या पार्सल सेवेसंदर्भातील संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी आवाहन केले आहे की जास्तीत जास्त ग्राहकांनी पोस्ट ऑफिस च्या या सुविधांचा लाभ घ्यावा व डाक विभागासोबत भागीदारी करून आपला व्यवसाय वाढवावा.
यावेळेस पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी पुणे क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व डिव्हिजन आणि गुणवंत कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि अशाच प्रकारे सातत्याने कामगिरी करत राहिल्यास पुणे क्षेत्राला सर्वच क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ स्थान प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला. याबरोबरच आवाहन केले की जनतेला सर्व प्रकारच्या सेवा प्रदान करताना कर्मचाऱ्यांनी सर्व सेवा आणि उत्पादनांच्या संदर्भातील माहिती सविस्तर ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यामुळे टपाल खात्यावरील जनतेचा विश्वास दृढ होईल. टपाल खात्यामधील व्याज दर हे इतर बँकांमधील व्याज दरांपेक्षा जास्त असून त्यामध्ये केलेली गुंतवणूक कोणत्याही इतर गुंतवणुकीपेक्षा सुरक्षित देखील असते. ऑनलाईन सर्व्हिस देणे, डिजिटल व्यवहार करणे अशा गोष्टी स्वीकारून टपाल खाते आता डिजिटल युगाशी सामना करण्यास सिद्ध झाले आहे. पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र, इंडिया पोस्ट पेमेंटस बँक, आधार सेंटर अशा नागरिकांसाठी असलेल्या सर्व सुविधा पोस्ट ऑफिस माध्यमातून उत्तम प्रकारे देण्यासाठी आपण कटिबध्द असू याची काळजी सर्वजण घेतील याची खात्री दिली.
श्री किशन कुमार शर्मा, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल यांनी सर्व पारितोषिक प्राप्त विजेत्यांचे कौतुक केले. भारतीय टपाल खात्याची ओळख असलेल्या पोस्टमन आणि ब्रांच पोस्ट मास्तर यांच्या कार्याचा गौरव करत असे सांगितले की जनतेच्या घराघरात सहजी पोहोचू शकणारे हे सर्वजण टपाल खात्याचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. टपाल खात्याच्या सेवा आणि सुविधा त्यांच्याचमुळे कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकतात. पुणे क्षेत्र नेहेमीच नव्या कल्पना राबवून उत्पन्नाचे नवे आयाम गाठत असते. पुणे क्षेत्रातील पोस्ट ऑफिस मधील प्रत्येकाने आपल्या सेवा सर्व नागरिकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. यामधे सर्व कर्मचारी यांनी प्रोफेशनल अप्रोच कसा येईल याची काळजी घेतली पाहिजे व जनतेला उत्तम सेवा दिली पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि स्वागत पुणे क्षेत्राचे असिस्टंट डायरेक्टर श्री. योगेश वाळुंजकर यांनी केले. आभार प्रदर्शन असिस्टंट पोस्टमास्टर जनरल श्री. अविनाश पाखरे यांनी केले आणि सूत्रसंचालन असिस्टंट सुप्रिंटेंडंट श्री दत्तात्रय वऱ्हाडी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी श्रीमती.स्वाती दळवी, श्री.दत्तात्रय खेडेकर, श्री.शरद वांगकर, श्री.नागेश डुकरे आणि रिजनल ऑफिस मधील सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.