पुणे : उबदार नात्यांच्या शोधात असणाऱ्या, दु:खाकडे पाहण्याची वेगळी नजर लाभलेल्या, जगण्यातले दुर्दैवी वास्तव आणि विचित्र विरोधाभास समर्थ लेखणीतून मांडणाऱ्या हिमांशु कुलकर्णी यांच्या कविता, गझल आणि रुबायांच्या प्रभावी अभिवाचनाची अनुभूती ‘तेव्हाची गोष्ट’ या कार्यक्रमातून पुणेकरांनी घेतली.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि श्रीराम लागू रंग-अवकाश यांच्या स्टेज इज युवर्स या उपक्रमाअंतर्गत सेतू अभिवाचन मंच, पुणेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम लागू रंग-अवकाश येथे रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम रंगला. कवी हिमांशु कुलकर्णी यांच्या कविता, गझल आणि रुबयांचे भावोत्कट अभिवाचन गीतांजली अविनाश जोशी, अनिरुद्ध दडके आणि दीपाली दातार यांनी केले. संहिता लेखन दीपाली दातार, दिग्दर्शन अनिरुद्ध दडके यांचे तर संगीत राघवेंद्र जेरे यांचे होते. कार्यक्रमाला हिमांशु कुलकर्णी यांच्यासह राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मूळ, मूळ नसतं दफनवलेले फूल असतं
पानं, पानं नसतात उन्हासाठी पसरलेले हात असतात
अशा काव्याची निर्मिती पहिल्यांदा कवी हिमांशु कुलकर्णी यांच्याकडून झाली. नोकरी निमित्त देश-विदेशात फिरताना मनाला भावलेला निसर्ग, दृष्टीस पडलेली सामाजिक विषमता, रूढी-परंपरांच्या जोखडात बांधलेल्या-पिचलेल्या स्त्री मनाच्या व्यथा अशा कितरीतरी गोष्टींनी त्यांच्या संवेदनशील मनाला हाक घातली आणि त्यांच्या लेखणीतून अनेक कविता उमटत गेल्या.
कवी हिमांशु कुलकर्णी यांनी परक्या भाषेतील रुबाई हा काव्य प्रकार आपल्या भाषेत आणताना, आपली संस्कृती आणि भौगोलिक स्थितीचे भान जपले म्हणूनच मातीचा अनुबंध आणि मराठी संस्कृतीचा गंध त्यांच्या रुबयांमध्ये सहजतेने जाणवतो आणि तिचे परकेपणच संपते. जन्म-मृत्यूचे वास्तव, राधा-कृष्णाचे भावबंध, स्त्रीची सामाजिक स्थिती हे विषय मांडताना त्यांनी परखड शब्दांचा वापर केला आहे.
‘हात हातात घेत होते तेव्हाची गोष्ट’, ‘ही दुनिया म्हणजे मोठा एक फलाट’, ‘या जंगलातले सगळेच वड’, ‘ही रुबाई आवडण्याची सक्ती नाही दोस्त’, ‘कोण म्हणतं चंद्र एकच असतो’, ‘तू आणि मी सारखेच आहोत दोस्त’, ‘अश्रूंना आता मोल राहिले नाही’, ‘वेगळी वेगळी यादी अपराधांची’, ‘पुतळा झाला म्हणून हुरळून जाऊ नकोस’ असा गूढ भावार्थ दडलेल्या रचनांनी विशेष दाद मिळविली आणि ‘मैफिलीत बसले होते सगळेच रावण’, ‘मदिरा नव्हती का तेव्हाच्या द्राक्षात’ अशा रुबायांनी वातावरणात हास्याची पखरण केली.
यंत्रयुगातील कोलाहलापासून दूर गेलेल्या हिमांशु यांना प्रतिकूल वातावरणात आलेल्या एकटेपणातून, स्वत:च्या मनाशी एकरूह होण्याची आस लागली आणि त्यातूनच विविध प्रकारच्या कविता कागदावर उमटू लागल्या. चर्च, ऑर्गनचे सूर, अंधारलेले ग्रेव्हयार्ड, अंधुक मेणबत्ती अशा प्रतिमांमधून कवी हिमांशु यांची प्रतिभा प्रकट होऊ लागली. कवितांमधून गूढ, अनाकलनीय, कधी उजाड, उदास वातावरण निर्मिती झाली तर कधी त्यांच्या काव्यपंक्तीनी धगधगत्या वास्तवतेचे भान दिले.
माणासाच्या भावनांचे हिंदोळे दर्शविताना त्यांनी लिहिलेल्या ‘जगणे गहाण माझे उसनेच श्वास आता, वाळूत मृगजळाचे फसवेच भास आता’ या काव्यपंक्ती रसिकांना विशेष भावल्या. मंद पार्श्वसंगीतासह उत्तरोत्तर रंगत गेलेली ही अभिवाचनाची मैफल रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी ठरली.
फोटो ओळ : सेतू अभिवाचन मंच, पुणे आयोजित ‘तेव्हाची गोष्ट’ कार्यक्रमात अभिवाचन करताना गीतांजली जोशी, अनिरुद्ध दडके आणि दीपाली दातार.
प्रति,
मा. संपादक
ज्येष्ठ कवी हिमांशु कुलकर्णी यांच्या कविता, गझला आणि रुबायांवर आधारित ‘तेव्हाची गोष्ट’ या कार्यक्रमाचे सेतू अभिवाचन मंच, पुणेतर्फे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
दीपाली दातार, संयोजक