Spread the love

नव भारतासाठी स्त्रीयांना सक्षम करावे
पद्मविभूषण डॉ. माशेलकर यांचे विचार – ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ चा शुभारंभ
‘हिरकणी’ योजनेत तीन मुलींचे स्वीकारले पालकत्व

पुणे, १६ डिसेंबरः “नव भारत एका पायावर धावू शकत नाही, तर तो दोन पायावरच चालवायला लागेल. त्यासाठी स्त्रीयांना सक्षम करणे आवश्यक आहे. त्या अधिक संयमी व संवेदनशील असतात. त्यामुळेच स्त्रीयां व मुलींना केवळ शिक्षण नाही तर भरपूर शिक्षण द्या पण त्यांच्या लग्नाची घाई करू नका. शिक्षण म्हणजेच भविष्य हे सूत्र सतत लक्षात ठेवावे.” असा सल्ला जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी दिला.
‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या संस्थेच्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या हिरकणी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. हा कार्यक्रम सीओईपी च्या किर्लोस्कर सभागृहात संपन्न झाला.
यावेळी द एम्पॉवर हर फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष संदीप नुलकर, सचिव प्रसिद्ध सिने दिग्दर्शक निपूण धर्माधिकारी, कोषाध्यक्ष ऋषिकेश अत्रे व संचालिका रूपाली शिंदे-आगाशे उपस्थित होते.
संस्थेच्या हिरकणी योजने अंतर्गत या वर्षी गायत्री रावडे, दिया दिघे आणि पियुषा पांडव या तीन मुलींना कायम स्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाणार असून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होई पर्यंत त्यांच्या सर्वांगीण विकासावर काम केले जाणार आहे. या मुलींना डॉ.माशेलकर यांच्या हस्ते स्वीकृती देण्यात आली.
बासमती तांदूळ व हळद पेटंट करू पहाणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या विरोधात त्यांनी उभारलेल्या लढ्यासाठी याप्रसंगी डॉ. माशेलकर यांना बासमती तांदूळ आणि हळदीची प्रतीकात्मक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. माशेलकर म्हणाले, “वस्तूस्थिती पाहता भारताच्या वर्कफोर्स मध्ये केवळ २४ टक्केच महिला आहेत. ही टक्केवारी चीनमध्ये ६० टक्के, व्हिएतनामा ७० टक्के आणि बांग्लादेश ही आपल्यापेक्षा अधिक पुढे आहे. चीनने कित्येक वर्षापुर्वीच बौद्धिक आणि शारीरिक बळावर चालणार्‍या नोकर्‍या महिलांना दिल्या आहेत. आपल्या देशात बेटी बचाव बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, सेविंग स्कीम, कन्या श्री प्रकल्प व शिक्षणाच्या योजना आहेत. त्याला अधिक विस्तृत स्वरूप देणे कालानुरूप गरजेचे आहे. देशात आजही अंधश्रध्दा दिसून येते. चंद्रावर मंगळयान पोहचले परंतू देशात अजून मंगळ असल्या कारणेने मुलींची लग्न ठरत नाहीत. ही विचारणीय बाब आहे.”
“सृष्टीवरील सर्वात मोठे सूत्र एज्यूकेशन इक्वल टू फ्यूचर हे आहे. आज भविष्याचा वेध घेतांना पुण्यात असे कार्य सुरू होणे हे महत्वाचे आहे. या कार्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि अनुभवा बरोबरच पैसा आणि वेळ ही महत्वाची आहे. ज्या प्रकारे सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांनी क्रांती आणली, त्याचप्रमाणे हिरकणी योजना ही मोठी चळवळ म्हणून पुढे येईल. ”
संदीप नुलकर म्हणाले, “महिलांची व्यथा जवळून पाहिल्यामुळे त्यांच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. वंचित मुलींना दर्जात्मक शिक्षणाबरोबरच योग्य रोजगार मिळावा आणि त्यांचे व कुटुंबाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी ‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. यातील हिरकणी योजने अंतर्गत मुलींना कायम स्वरूपी शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाऊन त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संहिता चांदोरकर यांनी केले.

‘द एम्पॉवर हर फाउंडेशन’
पुणें

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *