– पहिल्या जागतिक ध्यान दिनानिमित्त बीके सरिताबेन राठी यांना ‘सूर्यभारत ग्लोबल पीस अवॉर्ड’ प्रदान
नियमित ध्यान आनंदी, तणावमुक्त जीवनाचा मूलमंत्र
- बीके सरिताबेन राठी यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये जागतिक ध्यान दिवस उत्साहात साजरा
- पहिल्या जागतिक ध्यान दिनानिमित्त बीके सरिताबेन राठी यांना ‘सूर्यभारत ग्लोबल पीस अवॉर्ड’ प्रदान
पुणे: “आजच्या स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताण, झोप न येणे, भीती वाटणे यांसारखे मानसिक विकार वाढत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी मेडिटेशन हा एकच उपाय आहे. मन शांत, तन शांत आणि विचार शांत ठेवण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे. आनंदी, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान (मेडिटेशन) करायला हवे,” असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीच्या सरिताबेन राठी यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ‘पहिल्या जागतिक ध्यानदिना’निमित्त सरिताबेन राठी यांच्या मेडिटेशन सत्राचे आयोजन केले होते. ‘सूर्यदत्त’च्या बावधन प्रांगणातील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, संचालक प्रशांत पितालिया, सूर्यदत्ताचे सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोट्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ब्रह्माकुमारी केंद्राच्या माध्यमातून समाजात शांतता आणि तणावमुक्त जीवन प्रस्थापित होण्यासाठी कार्यरत असलेल्या सरिताबेन राठी यांना ‘सूर्यभारत ग्लोबल पीस अवॉर्ड-२०२४’ व भगवान महावीर यांचे मंगल मुद्रेतील शिल्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच भगवान महावीर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेडिटेशन करत मनःशांतीचा संदेश आत्मसात केला.
सरिताबेन राठी म्हणाल्या, “छोट्या-छोट्या गोष्टींमुळे ताणतणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे. तरुण पिढीतील सहनशीलता, समजूतदारपणा, एकाग्रता व सातत्य याचा अभाव याला कारणीभूत आहे. अशावेळी मन:शांती, स्थैर्य खूप गरजेचे आहे. नियमित मेडिटेशन केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आनंदी व समृद्ध जीवन जगता येईल. ध्यान म्हणजे डोळे बंद करणे नव्हे, तर बंद डोळे उघडणे असून, स्वतःच्या प्रकाशाचा वेध घेत आपण केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी नियमित ध्यान करायला हवे. सूर्यदत्त विद्यार्थ्यांमध्ये अशा जीवनमूल्यांची रुजवणूक करते, याचा आनंद वाटतो.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, ‘संकल्प से सिद्धी तक’ हे ब्रम्हकुमारीचे ब्रीदवाक्य असून, आपल्या जीवनाचे अंतिम ध्येयही हेच आहे. ध्यानधारणेचे महत्व अपार आहे. अनेक महान सेलिब्रिटी, राजकीय नेते नियमित ध्यानधारणा करतात. त्यातून आपले आयुष्य समृद्ध आणि सुखी होण्यास मदत होते. सबंध विश्वातील जागतिक ध्यान दिनानिमित्त होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम आहे. सूर्यदत्त फक्त सर्वोत्तम शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करते. भगवान महावीर मेडिटेशन सेंटर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना, तसेच त्यांच्या पालकांना मेडिटेशन करण्यासाठी खुले राहणार आहे.
प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.
फोटो ओळ
Suryadatta 1 & 2 – बावधन: जागतिक ध्यान दिनानिमित्त ब्रह्माकुमारी सरिताबेन राठी यांना ‘सूर्यभारत ग्लोबल पीस अवॉर्ड-२०२४’ प्रदान करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया.
Suryadatta 3 – बावधन: जागतिक ध्यान दिनानिमित्त भगवान महावीर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन करताना ब्रह्माकुमारी सरिताबेन राठी आणि प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया.