पुणे:- दिनांक 24 डिसेंबर 2024.
शाकाहारी, मांसाहारी पदार्थांवर ताव मारत पुणेकरांनी आपली खवय्येगिरी याही वर्षी जपल्याचे गर्दीवरून तरी दिसून आले. सुरमई, पापलेट, भिगवणची चिलापी, बोंबील चटणी, गावरान चिकन, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, डेलीशीयश चिकन, मटण दालच्या, यांसह खान्देशी मांडे, ज्वारी , बाजरी तांदळाच्या भाकरी, उकडीचे मोदक, लुसलुशीत हुरडा, गुळाचा चहा, मास वडी, खपली गव्हाची खीर , ताजा चीक व त्यापासून बनविलेले इतर पदार्थ, कोल्हापुरी स्पेशल पान आशा सर्व प्रकारच्या पदार्थांवर पुणेकर ताव मारताना दिसले. पुणे व परिसरातील लहान मुलांनी पालकांसह भीमथडीला हजेरी लावली.
ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फौंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन भीमथडी जत्रेचे आयोजन केले जाते. शेती ही या वर्षीची थीम असून डॉ अप्पासाहेब पवार यांच्या शेतील योगदानाबद्दल 18 वि भीमथडी जत्रा त्यांना समर्पित आहे.
भीमथडीत विविध दालने असून शेतकरी दालनात विविध प्रकारची भरडधान्य , सेंद्रिय फळे, भाजीपाला व फळांची विविध रोपे, शोभिवंत रोपे इ प्रकारची कलमी रोपे विक्रीस उपलब्ध आहेत.
भीमथडीत शालेय मुलांनी कुंभार कामाचा पण अनुभव घेऊन उद्याची हीच कौशल्य आत्मसात करण्याची इच्छा व्यक्त केली.
उद्या भीमथडीचा शेवटचा दिवस असून पुणेकरांनी भीमथडीला आवर्जून भेट द्यावी व पुण्यातील सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हावे असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.