शिस्तप्रिय, नैतिक व आदरभाव जपणारी पिढी घडावी: अनिल गोगटे

Spread the love

  • विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मुलींच्या वसतिगृहातील ‘डॉ. लीलावती गोगटे योगासन कक्ष व आरोग्य केंद्रा’चे उद्घाटन

पुणे, ता. ३: महिला शिक्षण आणि सक्षमीकरण हे माझ्या पत्नीचे ध्येय आहे. तिच्या ध्येयपूर्तीसाठी आम्ही नेहमीच अशा सामाजिक संस्थांना सहाय्य करतो. शिस्तप्रिय, नैतिक आणि आदरभाव जपणारी पिढी घडायला हवी. विद्यार्थी साहाय्यक समिती युवा पिढीला घडवण्याचे काम करत आहे. डॉक्टर असलेल्या लीलावती या माझ्या बहिणीच्या नावाने समितीला ही देणगी दिली असून, त्यातून सत्कार्य घडेल, असा विश्वास आहे,” अशी भावना उद्योजक अनिल गोगटे यांनी व्यक्त केली. घेण्यापेक्षा देण्यातला आनंद मोठा असल्याचे प्रेमा गोगाटे यांनी नमूद केले.

विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मुलींच्या नवीन वसतिगृहामध्ये उभारण्यात आलेल्या कै. डॉ. लीलावती गोगटे योगासन कक्ष व आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी गोगटे बोलत होते. या केंद्रासाठी प्रेमा गोगटे व अनिल गोगटे यांनी विद्यार्थी साहाय्यक समितीला एक लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ८५ लाख ६१ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे. यावेळी प्रेमा गोगटे, त्यांची कन्या शैला आर्मब्रस्ट, जावई रिचर्ड आर्मब्रस्ट, नाती लीला व इंदिरा, समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विश्वस्त मकरंद फडके यांच्यासह कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

प्रतापराव पवार म्हणाले, “योग हा फक्त शारीरिक व्यायाम नाही, तर मानसिक स्थैर्यासाठी गरजेचा आहे. योग केल्याने एकाग्रता वाढते, मनःशांती मिळते. त्यामुळे आपण आपले काम, अभ्यास अधिक उत्तमरीत्या पूर्ण करू शकतो. योग हा कला आणि विज्ञानाचा संगम आहे. विद्यार्थिनींचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी गोगटे परिवाराने केलेले अर्थसहाय्य महत्वपूर्ण आहे.”

प्रास्ताविकात तुषार रंजनकर म्हणाले, “समितीतील विद्यार्थ्याना काय करायचे, यापेक्षा काय करायचे नाही, हे सांगितले जाते. त्यामुळे स्वातंत्र्य असूनही समितीमध्ये चुकीच्या गोष्टी कधीही घडल्या नाहीत. समितीचा विद्यार्थी शिस्तप्रिय, मोठ्यांचा आदर करणारा आणि देशहित जपणारा असतो.”

विद्यार्थिनी सार्थता देशपांडे हिने सूत्रसंचालन केले, तर पर्णवी मस्के हिने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *