विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड
एन्ट्रो
संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे यांचे निधन झाले. त्या निमित्ताने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचा लेख
माझे मित्र व परमस्नेही श्रीकृष्ण भिडे हे आमच्या पूना इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर्कशॉप विभागाचे प्रमुख असताना, त्या ठिकाणी श्री. अष्टेकर नावाचे एक कारागीर, हे आळंदीच्या प्रसिद्ध साखरे महाराजांचे शिष्य होते. योगायोगाने, ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे यांचे एक व्याख्यान वर्कशॉपमध्ये आयोजित केले असताना, माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. संपर्क वाढत गेला, स्नेहबंध जुळत गेले. माझ्या पूज्य भगिनी प्रयागअक्कांची साखरे महाराजांवर फार मोठी निष्ठा होती. त्या अनेक वर्षापासून आळंदी-पंढरपूर या ठिकाणी त्यांची कीर्तनं-प्रवचनं न चुकता ऐकत असत. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून आमचे साखरे महाराजांच्या घराण्याशी निकटचे संबंध प्रस्थापित झाले. मी माझ्या मनातील इंद्रायणी नदीच्या तीरावरील अस्वच्छ व घाण परिसर स्वच्छ व सुंदर करण्याविषयीची व छोटासा का होईना घाट बांधण्याची संकल्पना साखरे महाराजांना बोलून दाखविली. आश्चर्य असे की, त्यावर साखरे महाराज एवढेच म्हणाले, “अहो कराड, माझ्याही मनामध्ये अनेक वर्षापासून हा विचार घोळतो आहे. मलाही वारकरी भाविकभक्तांच्या स्नानासाठी व तीर्थ म्हणून स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याची तीव्र इच्छा आहे. आपण सर्वांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे.”
योगायोगाने त्या आधी थोडयाच दिवसापूर्वी, श्री साखरे महाराज व त्यावेळचे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे अध्यक्ष, गांधीवादी विचारसरणीचे प्रसिद्ध बाळासाहेब भारदे यांची भेट झाली असताना, श्री भारदे यांनी त्यांना आवर्जून सांगितले की, रोजगार हमी योजनेखाली, श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणीच्या तीरावरील परिसर सुधारणेसाठी आम्ही तुम्हाला निधी देतो, परंतु तुम्ही या निधीतून इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील परिसर साफ व स्वच्छ करून, घाण पाण्याचा बंदोबस्त करून, घाटाच्या स्वरूपात काही कार्य उभे करा.
श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समितीचा शुभसंकल्प
२८ नोव्हेंबर १९८६ रोजी मला महापूजेला जाण्याचा योग आला. महापूजा संपल्यानंतर, सुवर्ण पिंपळाच्या समोरील मेघडंबरीस्वरूप बैठकीच्या जागी सर्व पूजेला आलेली भक्तमंडळी व प्रमुख वारकरी चहापानासाठी एकत्र आले. त्या दिवशी विशेष करून, महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याचे आयुक्त श्री. श्रीवास्तव, साखरे महाराज, शंकरबापू, माझे बंधू श्री. तुळशीराम कराड, माझ्या भगिनी पूज्य प्रयागअक्का कराड, पत्रकार श्री. मधुकर जोशी, आळंदी संस्थानचे बाळ ज. पंडित, प्रा. नूलकर, प्रा. प्र. ल. गावडे, श्री. मामासाहेब पिंपळे, श्री. ज्ञानेश्वर लांडगे, आळंदीचे त्यावेळचे नगराध्यक्ष श्री. दत्तोबा कुर्हाडे, त्यांचे सहकारी हजर होते. अनेक वेळेला माझ्या चर्चेमधून, आळंदी-देहू परिसर विकासाची संकल्पना मी साखरे महाराज, श्री. श्रीवास्तव, श्री. व्ही. पी. राणे, श्री. बाळासाहेब भारदे यांना बोलून दाखविली होती. मी या गोष्टीचा ध्यास घेतला आहे.
सहकार आयुक्त श्रीवास्तव यांनी मला आठवण करून दिली की, ‘आपण नेहमीच आळंदी-देहूच्या इंद्रायणीच्या तीरावरील परिसर विकासाच्या व घाट बांधणीच्या संकल्पना बोलून दाखविता, तर मग खरोखरीच तुम्हाला काही कार्य उभं करावयाचं असेल, तर मग श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकासाच्या कार्यासाठी एखादी समिती वा विश्वस्त मंडळ स्थापन का करीत नाही? मला असं वाटतं की, तुम्ही अशा प्रकारचा एखादा ट्रस्ट वा समिती स्थापन केल्याशिवाय, अशा प्रकारचे सामुदायिक कार्य उभे राहू शकत नाही. तेव्हा कराड साहेब, आपण स्वत: पुढाकार घेऊन, या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी आणि मग साखरे महाराज, बापू व इतर मान्यवर, त्याचे प्रमुख विश्वस्त वा सदस्य म्हणून सामावून घेऊन, या समितीद्वारे परिसर विकासाच्या कार्याला सुरुवात करावी.’ ही सूचना ऐकताच मी एवढेच म्हणालो, “श्रीवास्तव साहेब, आपली या कार्यासाठी समिती स्थापन करण्याची संकल्पना मला पूर्णपणे मान्य आहे, फक्त या समितीचा मी अध्यक्ष न होता, ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे हे अध्यक्ष असतील व ह.भ.प. श्री. शंकरबापू आपेगावकर हे याचे प्रमुख विश्वस्त असतील. मी एक प्रमुख कार्यवाह वा कार्याध्यक्ष म्हणून काम करायला तयार आहे.” त्यावेळी अनेकांनी देणगी दिली येथे अवघ्या तासाभराच्या आतच सुमारे रु. १,११,०००/- (एक लाख अकरा हजार रुपये) एवढी वर्गणीची रक्कम जमा झाली. श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या शुभकार्यामध्ये सहभागी झाले
वेदब्रह्मांची कसोटी
श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीच्या कार्याला चांगली गती येऊ लागली. मधल्या काळामध्ये ह.भ.प. श्री. साखरे महाराजांच्या समोर एक वेगळाच पेच निर्माण झाला. काही गैरसमजातून वा अज्ञानातून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या काही सदस्यांनी, साखरे महाराजांना संस्थानच्या मिटींगमध्ये विचारले की, “आपण या देवस्थान कमिटीचे विश्वस्त व सदस्य असताना, श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीसारख्या नवीन स्थापलेल्या संस्थेचे विश्वस्त/अध्यक्ष म्हणून कसे काय काम करू शकता? आपणास जर प्रा. कराडांनी स्थापन केलेल्या समितीवर काम करायचे असेल, तर देवस्थानच्या विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा, अथवा आम्हाला आपले विश्वस्तपद रद्द करावे लागेल.” ह.भ.प. श्री. साखरे महाराज त्यांनी त्यावर अतिशय शांतचित्ताने सर्व पदाधिकार्यांना विनम्रपणे विचारले की,“देवस्थान समिती व श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती या दोन्ही संस्थांचे कार्य हे संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या नावानेच होणार आहे, तेव्हा या दोन कामामध्ये भेदभाव करण्याची गरज काय? मी तर प्रा. विश्वनाथ कराड सरांना वचन दिले आहे आणि त्यानुसार माऊलींच्या संजीवन समाधीसमोर आम्ही हे कार्य करण्याचा संकल्प सोडला आहे. तेव्हां मी श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!’ पुढे दुर्दैवाने, देवस्थान समितीने साखरे महाराजांचे विश्वस्तपद रद्द केले, परंतु साखरे महाराजांनी आपला शब्द बदलला नाही व ते या संस्थेच्या कार्याला वचनबद्ध राहिले,
साखरे महाराजांच्या अंगची विद्वत्ता, त्यांचा वेदाभ्यास, ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व, कुठलीही विद्यापीठाची पदवी नसतानादेखील पुणे व नागपूर विद्यापीठाचे पी.एचडी.चे गाईड असणं, त्यांचं अत्यंत व्रतस्थ जीवन, त्याचबरोबर आषाढी वारीच्या वेळी उपवास करून, पूर्णपणे पायी चालण्याचा त्यांचा प्रघात, या सर्व गोष्टींच्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात अतिशय आदर होता. मी स्वत: नेहमी इतरांच्या अंगी असलेले सकारात्मक गुणच पाहात आलो आहे. ‘सद्गुणांची पूजा हीच ईश्वर पूजा’ अशी माझी धारणा आहे, त्यामुळे अशा स्वरूपाच्या व्यक्तीद्वेषापोटी केल्या जाणार्या टीकेकडे मी नेहमीच दुर्लक्ष करीत आलो.