पुणे : काम करताना लाभाचा अथवा सन्मानाचा विचार करू नका, हातात आलेले काम उत्कृष्ट कसे करता येईल, त्यात आपले वेगळेपण कसे दाखविता येईल, याचा विचार करा. यातून आपली कला शुद्ध होईल आणि सर्वांना भावेल. सतत कलेचा विचार करा, रोज रियाज करा असा सल्लाही प्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे प्रमोद कांबळे यांचा अभिनव जीवन गौरव पुरस्कार देऊन आज (दि. 21) सन्मान करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. पुरस्काराचे वितरण भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव, कार्यक्रमाचे अध्यक्ष पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.
समाजात अभावानेच आढळणाऱ्या चित्रकलेची साक्षरता वाढविली पाहिजे. सरकारी खुर्चीवर बसलेले अधिकारी कलाविषयात विशेषत: चित्र-शिल्पकलेत साक्षर नसल्यामुळे त्यांच्या सल्ल्याने तयार होणारी कलाकृती अपूर्ण अथवा अयोग्य होते आणि त्याचे समाजात हसे होते, अशी टिप्पणीही कांबळे यांनी या प्रसंगी केली.
प्रास्ताविकात पुष्कराज पाठक म्हणाले, चांगल्या व्यक्ती संस्थेची जोडल्या जाणे हे संस्थेचे भाग्य असते. उत्तम आणि गुणी माणसांमुळेच संस्थेच्या कार्याचे वटवृक्षात रुपांतर झाले आहे. विनम्रता ठेवल्यास सर्व गोष्टी मिळत जातात. विद्यार्थ्यांनी वाढत्या वयानुसार प्रगल्भ होत जाणे आवश्यक आहे. प्रमोद कांबळे नम्रपणे करत असलेल्या कलासाधनेचा विद्यार्थ्यांनी आदर्श ठेवावा असे सांगून समाजातील चांगल्या व्यक्तींचा आदर्श ठेवा, त्यांचे नुसते अनुकरण करू नका असे आग्रहपूर्वक सांगितले. बी. एम. पाठक यांच्या नावे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराविषयी त्यांनी अवगत केले.
प्राचार्य प्रा. राहुल बळवंत (अभिनव कला महविद्यालय, टिळकरोड), प्राचार्य डॉ. संजय भारती (अभिनव कला महविद्यालय, पाषाण), प्राचार्य अभिजित नातू (वास्तु विद्या महाविद्यालय, टिळकरोड), सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. तानाजी भंडारे आदी मान्यवर मंचावार होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. बिबेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात पुरस्कार वितरण सोहळा झाला. पुरस्कराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. सुरुवातीस कांबळे यांच्या कार्याची माहिती चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली.
या निमित्ताने भारतीय कला प्रसारिणी सभेच्या अभिनव कला महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींचे अभिनव रंगभाषा या 85व्या कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन कांबळे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन बिबेवाडीतील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहात भरविण्यात आले असून प्रदर्शन दि. 23 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात सर्वांसाठी खुले आहे.
चित्रप्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिनव कला महाविद्यालयातील 17 विद्यार्थ्यांना बी. एम. पाठक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाविद्यालयात 36 वर्षे अविरत सेवा देणारे ग्रंथपाल कांतिलाल ठाणगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्वागत सचिव पुष्काराज पाठक, प्राचार्य राहुल बळवंत यांनी केले. मानपत्राचे वाचन आणि सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले. आभार प्राचर्य राहुल बळवंत यांनी मानले आणि संस्थेचे भक्कम पाठबळ हिच यशस्वीतेची खात्री आहे, असे सांगितले.
फोटो ओळ : भारतीय कला प्रसारिणी सभा आयोजित अभिनव जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात (डावीकडून) प्राचार्य राहुल बळवंत, प्रमोद कांबळे, संस्था सचिव पुष्कराज पाठक, प्राचार्य डॉ. संजय भारती, प्राचार्य अभिजित नातू.
प्रति,
भारतीय कला प्रसारिणी सभेतर्फे प्रमोद कांबळे यांचा अभिनव जीवन गौरव पुरस्कार देऊन आज (दि. 21) सन्मान करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
पुष्कराज पाठक, सचिव, भारतीय कला प्रसारिणी सभा, पुणे