आंबवणेच्या आजी-माजी सरपंचांचा ग्रा. पं. सदस्यांना पत्रकार परिषदेतून इशारा
पुणे – भ्रष्टाचारासह विविध प्रकारचे खोटे व बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांचे पितळ आगामी काळात उघडे पाडणार असून, आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवून कोर्टात खेचणार व कायद्याचा दणका देणार, असा इशारा आंबवणे ग्रा. पं. चे माजी सरपंच मच्छिंद्र कराळे व विद्यमान सरपंच सीता कराळे यांनी एका पत्रकार परिषदेत दिला.
आंबवणेच्या सहा ग्रा. पं. सदस्यांनी काही दिवसांपूर्वी श्रमिक पत्रकार भवनात एक पत्रकार परिषद घेऊन कराळे दाम्पत्यांवर भ्रष्टाचारासह विविध प्रकारचे आरोप केले होते. त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आजी-माजी सरपंचांनी सोमवार २७ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना सडेतोड उत्तर दिले.
मच्छिंद्र कराळे यांनी सांगितले की, ज्यांनी माझ्यावर आरोप केले, तेच स्वतः प्रचंड भ्रष्टाचारी आहेत. त्यांनीच कंत्राटदाराला बिले मंजूर करण्यासाठी ६ लाख रुपयांची लाच मागितली. त्याचा आॅडिओ-व्हिडिओ पुरावा माझ्याकडे आहे. आरोप करणाऱ्या सदस्यांनी ग्रामसेवकांना हाताशी धरून बनावट दाखले तयार केले, बेकायदेशीररित्या ग्रा. पं. चे रेकाॅर्ड कार्यालयाच्या बाहेर नेले, ज्या ठिकाणी घरे नाहीत त्या ठिकाणी घरे दाखवली. बनावट कागदपत्रे तयार करून आदिवासी व गायरान जमिनी बखलावल्या. उपसरपंच मेंगडे हे लेबर सप्लाय करण्याचे काम करतात. परंतु त्यांनी अनेक गोरगरीब मजुरांचे पगार व प्राॅव्हिडंड फंडाचे पैसे हडप केले. ज्या महिलांचे पैसे मेंगडे यांनी बुडवले, त्या महिला जेंव्हा पैसे मागतात, तेंव्हा ते महिलांना धमकावण्याचे काम करीत असतात. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत. स्वतःचा भ्रष्टाचार बाहेर येऊ नये, म्हणूनच ते आमच्यावर धादांत खोटे आरोप करीत आहेत.