पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि महात्मा गौतमबुद्ध हे ज्ञानाचे मूर्तीमंत प्रतिक आहेत. त्यांनी मानवकल्याणाचा संदेश दिला. त्याच मार्गावरून जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वाटचाल करून गोरगरीबांच्या कल्याणासाठी कष्ट सोसले. महामाता रमाई यांनीही त्यांना आयुष्यभर साथ दिली. महामाता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन त्याग आणि समर्पणाचे द्योतक आहे, अशा भावना एम. आय. टी. शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वानाथ कराड यांनी व्यक्त केल्या.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात शुक्रवारी (दि. 7) एम. आय. टी. शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड आणि विमल नडगम यांचा रमाईरत्न पुरस्कराने गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी सत्कार स्वीकारल्यानंतर डॉ. कराड बोलत होते. महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, लता राजगुरू, महेश थोरवे, ॲड. अविनाश साळवे, प्रा. रतनलाल सोनग्रा, देवेंद्र कांबळे मंचावर होते.
रमाईरत्न पुरस्कार स्वीकारताना आंतरिक समाधान मिळाले आहे, असे आवर्जून सांगत डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांचे कार्य मानवताधर्मी आहे. त्यांनी समाजबांधवांच्या उद्धाराकरिता अनेक कष्ट सोसले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे आपल्यालाही समाजासाठी कणभर तरी कार्य करता येईल का असा विचार आपल्या मनात सतत असतो.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, ज्ञान आणि अध्यात्माची बेरीज करणाऱ्या डॉ. कराड या शांतीदूताचा सन्मान माझ्या हस्ते होत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉ. कराड यांनी सर्व धर्मातील विचारसूत्र अंगीकारली आहेत. हा खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा प्रयोग आहे. ते पुढे म्हणाले, रमाई महोत्सवात ज्ञानाची पूजा होते. हा मातृत्वाचा, माणुसकीचा महोत्सव आहे.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, गेल्या 12 वर्षांपासून सुरू असलेला महोत्सव नावारूपाला आला आहे. या महोत्सवाला जागतिक पातळीवर नेणे हा एकच उद्देश आहे.
ॲड. अविनाश साळवे, प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा सत्कार ॲड. प्रमोद आडकर, लता राजगुरू यांनी केला. सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार लता राजगुरू यांनी मानले.
फाटो ओळ : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात लता राजगुरू, ॲड. प्रमोद आडकर, विमल नडगम, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. श्रीपाल सबनीस, विठ्ठल गायकवाड.
प्रति,
मा. संपादक
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महामाता रमाई महोत्सवात शुक्रवारी (दि. 7) रमाईरत्न पुरस्काराने डॉ. विश्वनाथ कराड आणि विमल नडगम यांचा गौरव करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
विठ्ठल गायकवाड, मुख्य संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801