; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते; ते एक उच्च विभूती, असाधारण कर्तृत्वाचे महापुरुष होते. हिंदू साम्राज्याच्या निर्मितीसाठी शौर्य, चातुर्य, प्रताप, सूक्ष्म व्यवस्थापन याचा अंगीकार करत त्यांनी आदर्श राजाचा वस्तुपाठ घालून दिला. रामराज्याची संकल्पना असलेल्या रामायण आणि व्यवस्थापन कौशल्याचा महाग्रंथ असलेल्या महाभारतातील सद्गुणांची बेरीज म्हणजे छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व व चरित्र आहे,” असे गौरवपूर्ण प्रतिपादन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित शिववंदना महानृत्याविष्कार व परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित कार्यक्रमात माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमतचे चेअरमन विजय दर्डा, पुढारीचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, अभिनेता भाऊ कदम, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक संजय मालपाणी, लोकमतचे समूह संपादक विजय बावीस्कर, पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी आदी उपस्थित होते.
गोविंददेव गिरी म्हणाले, “सर्वांना पूज्य व प्रिय असे देवर्षी नारदमुनी आद्यपत्रकार होते. त्यांच्यापासून सुरु असलेल्या या पत्रकारितेच्या परंपरेने केलेला हा सन्मान आहे. तो नारदमुनींचा प्रसाद म्हणून स्वीकार करतो. पत्रकारांच्या संस्थेकडून असा सन्मान होणे ही सुखावणारी बाब आहे. समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचा उहापोह करून त्याला योग्य मार्गावर आणण्याचे काम पत्रकार करीत असतात. राष्ट्राच्या, समाजाच्या व धर्माच्या कल्याणासाठी पत्रकारांनी आपले कर्तव्य निष्ठेने बजावायला हवे.”
चंद्रकांत पाटील म्हणाले, “समाजातील रत्ने शोधून त्यांना सन्मानित करण्याचे पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. अध्यात्मिक क्षेत्रात स्वत:चे एक स्थान निर्माण केलेले, राम मंदिराच्या उभारणीत मौल्यवान योगदान दिलेले स्वामीजी सर्वांसाठी आदरणीय आहेत. त्यांचा सन्मान होणे ही समाधानाची गोष्ट आहे. चांगल्या कामासाठी निधी गोळा करण्याचे काम त्यांनी केले. उत्तम निरूपणासह देवकार्यासाठी मागण्याचे कौशल्य आणि विश्वास त्यांच्याकडे आहे.”
विजय दर्डा, डॉ. योगेश जाधव, कृष्णकुमार गोयल यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी संजय मालपाणी, भाऊ कदम, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, संपादक संजय आवटे, स्वप्नील सावरकर, अविनाश चिलेकर, ज्ञानेश्वर बिजले, बांधकाम व्यावसायिक विश्वास जावडेकर, गिरीराज सावंत, ओंकार वासकर, ईश्वर गौरांगदास, राजेंद्र शिळीमकर, बाबा कांबळे, निलेश खेडेकर, दशरथ भोसले, सिद्धार्थ भोकरे या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. किरण जोशी यांनी स्वागत भाषण केले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.