‘
- उपाध्यक्षपदी सीए प्रणव आपटे, सचिवपदी सीए निलेश येवलेकर, खजिनदारपदी सीए नेहा फडके, विकासा-अध्यक्षपदी सीए प्रज्ञा बंब
पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए सचिन मिणियार यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीए प्रणव आपटे, सचिवपदी सीए निलेश येवलेकर, खजिनदारपदी सीए नेहा फडके यांची, तर ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रज्ञा बंब यांची निवड झाली आहे. २०२५-२०२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांनी मावळत्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीए हृषीकेश बडवे, सीए सारिका दिंडोकर, सीए प्रितेश मुनोत, सीए नंदकुमार कदम काम पाहतील.
यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए रेखा धामणकर व सीए अभिषक धामणे, माजी अध्यक्ष सीए काशिनाथ पाठारे, सीए मोशमी शहा, सीए अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते. आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. विभागीय स्तरावर आयसीएआय पुणे शाखेला प्रथम, तर ‘विकासा’ विद्यार्थी शाखेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्व सहकारी व कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सीए सचिन मिणियार म्हणाले, “मला अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व सीए सदस्यांचे आभार मानतो. तंत्रज्ञान प्रशिक्षण, शाश्वत व पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर आणि पायाभूत सुविधांचा विस्तार या तीन गोष्टी प्रामुख्याने केंद्रस्थानी ठेवून पुढील वर्षभर काम करणार आहे. सीए सदस्य व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे उपक्रम वर्षभर राबवणार आहे. आज पुणे शाखेचे ११,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २५००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
फोटो ओळ :
नवनिर्वाचित कार्यकारिणीतील बसलेले सीए सचिन मिणियार, उभे डावीकडून सीए प्रज्ञा बंब, सीए नेहा फडके, सीए प्रणव आपटे व सीए निलेश येवलेकर.