पुणे, : केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे कार्यालय यंदाचा योग दिन येरवडा कारागृहामध्ये साजरा करत आहे. या मध्यवर्ती कारागृहाच्या खुल्या मैदानात होणाऱ्या कार्यक्रमात बंदिवान जन सहभागी होणार आहेत.
यावर्षीच्या दहाव्या योगा दिनाची संकल्पना ‘स्वत: आणि समाजासाठी योग’ अशी आहे.
या कार्यक्रमामध्ये केंद्रीय संचार ब्यूरोचे विभागीय कलाकार कथ्थक नृत्य प्रस्तुती तसेच योग गीते सादर करणार आहेत; त्यानंतर पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, जी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाअंतर्गत काम करते, या संस्थेचे योग अभ्यासक व प्रशिक्षक उपस्थितांचा योग सराव करून घेतील.
याप्रसंगी अमिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा; डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय), कारागृह व सुधारसेवा; स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, येरवडा आणि सुनील ढमाळ, अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे हे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत महाराष्ट्र व गोवा राज्य या क्षेत्राचे मुख्यालय म्हणून काम करते. या कार्यालयाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये दहा व गोवा राज्यात एक एकक कार्यरत आहे. हा विभाग भारत सरकारच्या विविध योजना तसेच, जनहित-जनसंवाद-सामाजिक वर्तणूक बदल या विषयात जनजागृतीचे काम करतो.