पिंपरी, पुणे (दि. १४ मार्च २०२५) पिंपरी चिंचवड शहराचे नाव औद्योगिक क्षेत्रात जागतिक पातळीवर अभिमानाने घेतले जाते त्याची पायाभरणी टाटा मोटर्स कंपनीच्या माध्यमातून ज्येष्ठ उद्योगपती स्वर्गीय रतन टाटा यांनी केली होती. वाहन निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाखो लोकांना रोजगार मिळत असून शहराच्या व देशाच्या आर्थिक विकासाला त्यामुळे गती मिळाली आहे. आपल्या कारखान्यातील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांना आपल्या कुटुंबातील सदस्य प्रमाणे सांभाळून त्यांच्यावर प्रेम करणारे स्वर्गीय रतन टाटा यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत टाटा मोटर्सचे कर्मचारी गोकुळ चव्हाण यांचा चिरंजीव मयुर व संभाजीनगर, चिंचवड येथील रहिवाशी आयु. सुधाकर गंगाधर तुंगेनवार यांची कन्या श्रुती यांचा अभिनव मंगल परिणय सोहळा नुकताच संपन्न झाला.
गोकुळ चव्हाण, संजय बनसोडे, सुधीर कडलख, पोपट भालेराव, शहाजी कांबळे या दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांच्या समन्वयातून या विवाह सोहळ्यात सर्वांपुढे पुरोगामी विचारांचा
आदर्श ठेवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांच्या प्रतिमेबरोबरच स्वर्गीय रतन टाटा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चव्हाण व तुंगेनवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वर्गीय रतन टाटा यांच्या विषयी देखील कृतज्ञता व्यक्त केली.
या विवाह सोहळ्यास तसेच वधु, वरांस आशिर्वाद देण्यासाठी शेती, उद्योग, कामगार,
राजकीय, सामाजिक, शिक्षण, कला, क्रीडा सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, प्रशासनातील विविध मान्यवर व नातेवाईक आप्तेष्ट बहुसंख्येने उपस्थित होते.