पुणे : घरकाम, करिअर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आज मुलींनी केवळ घर सांभाळून करिअर करावे, अशी शिकवण देण्यापेक्षा मुलांनाही घरकामाची सवय लावणे ही काळाची गरज आहे, असे मत पुणे महानगरपालिकेच्या उप-आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी व्यक्त केले.
उत्कर्ष महिला मंडळ व आधार सोशल फांऊडेशन व पुणे भारत गायन समाज च्यावतीने शनिपार चौकातील पुणे भारत गायन समाज येथे झालेल्या कार्यक्रमात भारतातील पहिल्या महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी व डाॅक्टर रखमाबाई राऊत यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, मृणालिनी रासने, गायिका सावनी दातार, मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सविता काळोखे, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश तुकाराम शिंदे, पुरण हुडके, शर्वरी काळोखे, अलका नहार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते शारदा गजानन मंडई गणपतीची आरती करण्यात आली.
डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या, महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर एका हातात झाडू आणि कपडे घेतलेली, तर दुसऱ्या हातात लॅपटॉप घेऊन करिअर सांभाळणारी महिला असे विविध चित्रण पाहायला मिळाले. मात्र, हा आदर्श म्हणून पाहण्यापेक्षा हे महिलांवर वाढलेल्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे.
सुषमा चव्हणा म्हणाल्या, आज महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना अनेकदा आपण फक्त बघ्याची भूमिका घेत असतो. अशावेळी या देशाचे नागरिक म्हणून मदत करणे ही आपली देखील जबाबदारी आहे. घरातील मुलींची काळजी करण्यापेक्षा त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे आणि घरातील मुलांवर पण योग्य संस्कार केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. दिलीप काळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ – उत्कर्ष महिला मंडळ व आधार सोशल फांऊडेशन व पुणे भारत गायन समाज च्यावतीने शनिपार चौकातील पुणे भारत गायन समाज येथे झालेल्या कार्यक्रमात भारतातील पहिल्या महिला डाॅक्टर आनंदीबाई जोशी व डाॅक्टर रखमाबाई राऊत यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.