- डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ डिझाईनमध्ये ‘स्केचवर्स-सलग २४ तास पेंटिंग उपक्रम’; गिनीज बुकमध्ये नोंद होणार
- कौशल्याधारित, रोजगारक्षम ‘गेम डिझाईन’ व ‘व्हीएफएक्स’ अभ्यासक्रम सुरु; प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांची माहिती
पुणे: ताथवडे येथील डॉ. डी. वाय. पाटील स्कुल ऑफ डिझाईनमध्ये साडेचार हजार चित्रांतून सर्वात अधिक लांबीची कॉमिक स्ट्रीप साकारण्याचा ‘लॉंगेस्ट कॉमिक स्ट्रीप’, तसेच सलग २४ तास पेंटिंग करण्याचा ‘स्केचवर्स’ हा उपक्रम घेण्यात आला. यासह डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट, गुडस्पीड गेम्स आणि व्हिज्युअल बर्ड्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्याधारित व रोजगारक्षम दोन पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव यांनी दिली.
विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील व कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दोन्ही उपक्रमांना डॉ. स्मिता जाधव यांनी भेट दिली. याप्रसंगी अमर चित्रकथाच्या सीईओ प्रीती व्यास, इंडियन कॉमिक पब्लिशर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजितेश शर्मा, डॉ. संजय भारती, डॉ. गिरीश चरवड, संदीप भामकर, अमित शिरोळे, अमित ढाणे, शरद गरोळे यांच्यासह स्कुल ऑफ डिझाईनचे सहयोगी अधिष्ठाता विनायक कुलकर्णी, संचालिका स्वप्नाली जाधव, उपप्राचार्य दीपाली जोशी, विभागप्रमुख डॉ. सिद्धांत वाघमारे, डॉ. सोमेश गुरव आदी उपस्थित होते.
‘मानवाची उत्क्रांती ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा प्रवास साडेचार हजार चित्रांतून मांडत त्याची स्ट्रीप करण्याचा हा जागतिक विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला जाणार आहे. या उपक्रमात ९० विद्यार्थी व १० शिक्षक सहभागी झाले असून, रोज ७ तास याप्रमाणे २१ तासांत ६००० चित्रे काढली आहेत. या चित्रांची दोन किलोमीटर लांबीची स्ट्रीप तयार करण्यात आली आहे. यापूर्वी जपानमध्ये १.६ किलोमीटर लांबीची कॉमिक स्ट्रीप करण्याचा विक्रम आहे. डॉ. डी. वाय. पाटील हा विक्रम मोडण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे डॉ. सिद्धांत वाघमारे यांनी सांगितले.
व्हिज्युअल कम्युनिकेशन विभागाच्या वतीने ‘स्केचवर्स’ या सलग २४ तास चित्रे रेखाटण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन झाले. देशभरातील १० ते ६५ वयोगटातील ८० कलाकार, विद्यार्थी, शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध्यपूर्ण, कलात्मक पद्धतीने लाईव्ह, आउटडुअर, स्टील लाईफ, मेमरी स्केचिंग आणि गेम्स रेखाटत चित्रकारांनी लक्ष वेधले. यासह स्टोरीटेलिंग, शास्त्रीय व उपशास्त्रीय, बॉलिवूड संगीत याचा सुरेख संगम साधत सादरीकरण झाले. चर्चासत्रामध्ये तज्ज्ञांनी कलात्मक अनुभव मांडल्याने विद्यार्थी प्रोत्साहित झाले. या उपक्रमातील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. ‘स्केचवर्स’साठी लागणाऱ्या स्टेज डिझाइन्स, बॅकड्रॉप फ्रेम्स व अन्य सर्व गोष्टी टाकाऊ साहित्यापासून विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत.
डॉ. स्मिता जाधव पुढे म्हणाल्या, डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंटच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षांपासून उद्योगाभिमुख दोन पदविका अभ्यासक्रम सुरु होत आहेत. गुडस्पीड गेम्स आणि व्हिज्युअल बर्ड्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने ‘गेम डिझाईन अँड क्वालिटी अश्युरन्स’ आणि ‘व्हिज्युअल इफेक्ट्स (व्हीएफएक्स)’ अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरीवर रुजू करून घेण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकताच सामंजस्य करारही करण्यात आलेला आहे. ‘गुडस्पीड’चे रणबीर होरा, द्रुहीन मुखर्जी व ‘व्हिज्युअल बर्ड्स’चे अमित मालवीय, निधी राय यांच्यासह अन्य तज्ज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन देणार आहेत. अधिक माहितीसाठी https://www.dypatilschoolofdesign.com/ या संकेस्थळाला भेट द्यावी. “