रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने कार्यकर्ता मेळावा आणि भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन

Spread the love

पुणे : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची तीसऱ्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात निवड झाल्याबदद्ल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्यावतीने येत्या रविवारी दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व धार्मिय नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी कार्यकर्ता मेळाव्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सांय ६.०० वा. हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती आरपीआयचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेस आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटक परशुराम वाडेकर, माजी अध्यक्ष अशोक कांबळे, युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष निलेश आल्हाट, राज्य कार्यकारिणीचे सदस्य मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाबुराव घाडगे, पुणे शहरचे सरचिटणीस श्याम सदाफुले, युवा आघाडीचे अध्यक्ष वीरेन साठे, प्रदेश सचिव महिला आघाडीच्या संघमित्रा गायकवाड, कार्याध्यक्ष मीना घालते, मातंग आघाडीच्या पुणे अध्यक्ष सुनील जाधव आणि मातंग आघाडी महिला पुणे शहराध्यक्ष नेहा पवार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले, सन २०२२ मध्ये पी.एच.डी. करणाऱ्या ७६३ अनुसूचित जाती जमातीच्या विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती अदयाप मिळालेली नाही. मात्र इतर जाती समुहाच्या विदयार्थ्यांना यावर्षांतील शिष्यवृत्ती राज्य शासना कडून देण्यात आलेली आहे. मग राज्य शासन अनुसूचित जाती जमातीच्या विदयार्थ्यां बरोबर भेदभाव का? रिपब्लिकन पक्षाची अग्रही मागणी आहे की, २०२२ च्या या पात्र विदयार्थ्यांना पूर्वी प्रमाणे १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी. तसेच शिक्षण हक्क कायदयाची इ. ८वी पर्यतं असलेली मर्यादा वाढवून इ. १२ वी पर्यंत करण्यात यावी आणि जाती निहाय जनगणना करण्यात यावी, या आमच्या राज्यस्तरीय प्रमुख मागण्या आहेत. येणाऱ्या मेळाव्यात आम्ही या मागण्या मांडणार आहोत.   

महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटक परशुराम वाडेकर म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात किमान १२ जागा भाजपा आणि मित्र पक्षाने सोडाव्यात, अशी आमची मागणी आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या पुरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चानंतर राज्य शासनाने यांना केवळ दहा हजार रूपये नुकसान भरपाई घोषित केली आहे. पण अद्याप देखील ती मिळालेली नाही. त्या ऐवजी किमान रु. २५ हजार प्रत्येकी नुकसान भरपाई शासनाने दयावी, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. त्याच प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, घोले रोड येथील वस्तीगृहाची इमारत बांधून तेथे शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना आरोग्य पूर्ण सर्व सोई अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच पुणे शहरात असलेल्या सर्व सरकारी मनपा खाजगी वस्तीगृहाची समाज कल्याण विभाग आणि पुणे महानगरपालिकेने आरोग्य पूर्ण सोई सुविधा आणि सुरक्षिततेची पहाणी करून योग्य त्या उपाय योजना कराव्यात, आदी मागण्या आम्ही येणाऱ्या आरपीआयच्या मेळाव्यात पक्षाध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या समोर मांडणार आहोत. 

दरम्यान, रिपब्लिकन पार्टि ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला ‘ऊस धारक शेतकरी’ (गन्ना किसान) हे निवडणूक चिन्ह गिळालेले आहे. या निवडणूक चिन्हाचे अनावरण देखील या सत्कार सोहळ्यात करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *