पुणे : पुण्यात एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या धडकेत 18 जण जखमी झाले आहेत. तर एकाचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकीच्या हद्दीतील बोपोडी येथे अपघात झाला. एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक देऊन हा अपघात झाला. सकाळी 9 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. एसटी बसमधून 12 जण प्रवास करत होते.
तर कारमधून 7 जण प्रवास करत होते. या अपघातामध्ये कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. तर एसटी बसमधील 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले.
कारमधील जखमी झालेल्या 6 जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे. मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एसटी बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे तर कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर जुन्या मुंबई-पुणे महामार्गवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
सध्या वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. खडकी पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.