शेळकेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम दिमाखात ; रोटरी क्लब ऑफ औंध यांचा उपक्रम

Spread the love

हिंजवडी, : रोटरी क्लब ऑफ औंध व रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयडीबीआय बँक यांच्या सहकार्याने ‘एक पेड माँ के नाम’ या योजनेअंतर्गत हिंजवडी येथील पिंपोळी, शेळकेवाडी ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाले. यावेळी ११४ हून अधिक झाडे लावण्यात आली.

‘एक पेड माँ के नाम’ या योजनेअंतर्गत रोटरी क्लब ऑफ औंध यांच्यावतीने आयडीबीआय बँकेचे सी.जी.एम आशुतोष कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, रोटरी क्लब ऑफ चे अध्यक्ष राजेंद्र शेलार, शेळकेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बालाजी शेळके, रोटरी क्लब ऑफ औंध चे प्रल्हाद साळुंखे, महाविद्यालयाचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. सुशील कुमार गुजर यांच्या सहकार्याने सदर वृक्षारोपण कार्यक्रम पार पडले.

याप्रसंगी बोलताना आशुतोष कुमार म्हणाले की, “झाडे लावणे हे आपले कर्तव्य आहे. जेव्हा आपण झाडे लावतो तेव्हा आपण एक जीव वाचवतो. झाड आपल्याला ऑक्सिजन देण्याचे काम करते. जसे झाड लावणे महत्त्वाचे आहे तसेच त्याचे पालन पोषण करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. झाड फक्त लावू नका तर त्याची काळजी देखील घ्या,” असे आवाहन यावेळी आशुतोष कुमार यांनी केले.

यावेळी जागतिक तापमानवाढीचा सामना कसा करावा, याविषयी उपस्थितांना प्रल्हाद साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना साळुंखे यांनी प्रकृतीचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे अतुलनीय महत्व आहे. जागतिक पातळीवर “झाडे लावा व जगवा” या संदेशाची गरज अधिक वाढली आहे कारण मानवी क्रियाकलापांमुळे पर्यावरणीय समस्या विकोपाला गेल्या आहेत. जंगलतोड, वाढती औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि प्रदूषणामुळे जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामान बदलाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे हे सर्वात प्रभावी साधन आहे.आजचा हा वृक्षारोपण कार्यक्रम. या निमित्त शेळकेवाडी येथील निसर्ग पाहण्याचे आम्हाला योग आले. येथे झाडांची योग्य प्रकारे काळजी घेतली आहे. त्याच प्रकारे आपण देखील झाडे लावून त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी झाडे लावून ते जपणे महत्त्वाचे आहे.”

याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शेळकेवाडी ग्रामपंचायत चे सरपंच बालाजी शेळके यांनी रोटरी क्लब ऑफ औंध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे आभार व्यक्त करत गावातील वेगवेगळ्या समस्या त्यांना बोलावून दाखविल्या तसेच वृक्षारोपण हा कार्यक्रम घेतल्या प्रकरणी त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यानंतर रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र शेलार यांनी सर्व उपस्थित यांचे तसेच विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास आयडीबीआय बँकेचे कर्मचारी, सहकारी तसेच गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता ग्रामस्थांच्या आनंददायी सरपंचाच्या फार्म हाऊस वर भोजनाने झाली. आयोजक राजेंद्र शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर डॉ. विनिता यांनी सुंदर सूत्रसंचालन केले. अशुतोष कुमार यांनी त्यांच्या कार्याची विशेष प्रशंसा केली. व कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *