पुणे : ऐलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव ग सुने आणि वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या अशी गाणी गात आणि फेर धरत ‘निवारा वृध्दाश्रमा’तील आजींनी भोंडल्याचा आनंद लुटला.
चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट आणि गोखलेनगरमधील सुयोग मित्र यांनी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. निवारा वृध्दाश्रमातील पन्नासहून अधिक महिलांनी सहभाग घेतला. महिलांनी भोंडल्याबरोबर फुगड्याही घातल्या.
गेली दहा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. वृध्दाश्रमात जीवन जगत असलेल्या महिलांच्या बालपणातील स्मृतींना उजाळा मिळतो. त्यामुळे नवरात्रीचे वेध लागले की या कार्यक्रमाची उत्सुकता असते. कार्यक्रमानंतर गत आठवणींना उजाळा देत भावनाविवश होतात. अशी प्रतिक्रिया निवाराच्या फीजिओथेरपी प्रमुख छाया काळे यांनी व्यक्त केली.
रंजना पवार, सारिका धुमाळ, कल्पना भवारी, वनिता मापुस्कर, नेहा कामत, सुजाता ढेकणे यांनी संयोजन केले.