पुणे, : दरवर्षी ६ ऑक्टोबर रोजी जागतिक सेरेब्रल पाल्सी (सीपी) दिन साजरा केला जातो. या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी संचेती हॉस्पिटल मध्ये विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीची संकल्पना ही यूनिकली सीपी ही आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास काकतकर व सन्माननीय अतिथी म्हणून प्रसिद्ध मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता आनंद इंगळे उपस्थित होते. याप्रसंगी सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन आणि संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ पराग संचेती, संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉ.लवनिश त्यागी, पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटवर्धन, संचेती हेल्थ केअर अकॅडेमीच्या अध्यक्ष मनीषा संघवी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मुलांनी प्रार्थना व नृत्य सादर केले.तसेच सेरेब्रल पाल्सी योद्ध्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अ टेल ऑफ थ्री मदर्स ही नाटिका पालकांनी सादर केली.
सेरेब्रल पाल्सी असलेल्या तरुणांनी सांगितलेल्या आपल्या यशोगाथावर लोकप्रिय अभिनेता आनंद इंगळे म्हणाले की, हे खरे यश असून आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. याप्रसंगी आनंद इंगळे यांनी या मुलांसाठी नाटक व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा आयोजित करण्याचे वचन दिले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे चे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष विकास काकतकर म्हणाले की,समाजाच्या दृष्टिकोनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडत आहे आणि ही स्वागतार्ह बाब आहे.
संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ पराग यांनी या मुलांच्या प्रवासामध्ये महत्वाची भूमिका असलेल्या बालरोग विभाग आणि फिजिओथेरपी विभागातील लोकांचे कौतुक केले.
पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटवर्धन म्हणाले की, सेरेब्रल पाल्सी असणाऱ्या मुलांना समाजात एक स्थान प्राप्त व्हावे व या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मुलांच्या पालकांनी देखील सीपी आजाराबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. सेरेब्रल पाल्सी जरी बरा होत नसला तरीही आपण योग्य ती काळजी आणि देखभाल नक्कीच घेऊ शकतो.
आपल्या स्वागतपर भाषणात बोलताना संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनचे प्रमुख डॉ.लवनिश त्यागी म्हणाले की, हा दिवस जागरुकता निर्माण करण्याचा आणि सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांचे यश साजरे करण्याचा आहे.
संचेती इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशनच्या फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख डॉ. दर्शिता नरवानी यांनी आभार व्यक्त केले.