पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी, न्युट्रीलिशियस् संघांची विजयी घौडदौड !!
पुणे, २३ डिसेंबरः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमी संघाने स्पर्धेत सलग तिसरा तर, न्युट्रीलिशियस् संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून स्पर्धेत चौथा विजय मिळवला.
सहकारनगर येथील ल. रा. शिंदे हायस्कूल मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत दिग्विजय जाधव याच्या नाबाद ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमीने हेमंत पाटील क्रिकेट अॅकॅडमीचा पराभव करून स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना सचिन राठोड याच्या ७७ धावांच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अॅकॅडमीने १५० धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान पुनित बालन केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमीने १९.२ षटकात व ३ गडी गमावून पूर्ण केले. दिग्विजय जाधव याने नाबाद ८४ धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
हृषीकेश राऊत याच्या नाबाद ५७ धावांच्या जोरावर न्युट्रीलिशियस् संघाने पुणे पोलिस संघाचा ९ गडी राखून पराभव करत चौथा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुणे पोलिस संघाचा डाव न्युट्रीलिशियस्च्या गोलंदाजी समोर ८० धावांवर आटोपला. हृषीकेश राऊत (नाबाद ५७ धावा) आणि धीरज जैन (नाबाद १७ धावा) यांच्या फलंदाजीच्या जोरावर न्युट्रीलिशियस्ने ही धावसंख्या ९.४ षटकात व १ गडी गमावून पूर्ण केली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
हेमंत पाटील क्रिकेट अॅकॅडमीः २० षटकात १० गडी बाद १५० धावा (सचिन राठोड ७७ (३८, ८ चौकार, ४ षटकार), ऋतुराज धुलगुडे १६, अक्षय चव्हाण ४-२३) पराभूत वि. पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अॅकॅडमीः १९.२ षटकात ३ गडी बाद १५४ धावा (दिग्विजय जाधव नाबाद ८४ (६०, ११ चौकार, २ षटकार), अभिमन्यु जाधव २२); सामनावीरः दिग्विजय जाधव;
पुणे पोलिसः १४.३ षटकात १० गडी बाद ८० धावा (पृथ्वीराज गायकवाड २०, प्रशांत गायकवाड १९, ओम पवार ३-८, वैभव विभुते २-११, नविन कटारीया २-२३) पराभूत वि. न्युट्रीलिशियस्ः ९.४ षटकात १ गडी बाद ८३ धावा (हृषीकेश राऊत नाबाद ५७ (३२, ६ चौकार, ४ षटकार), धीरज जैन नाबाद १७); सामनावीरः हृषीकेश राऊत;