पुणे, दि. १६: दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये ३१३ मतदान केंद्र असून ३ लाख १९ हजार ३११ इतकी मतदारसंख्या आहे; त्यापैकी १५ नोव्हेंबर अखेर २ लाख ५ हजार ६५ इतक्या मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले. त्याचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढावी, यादृष्टीने निवडणूक प्रशासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता नियोजन करण्यात येत असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरु आहे.
मतदारांना आपल्या केंद्राचे नाव आणि स्थळांची माहिती होऊन मतदान प्रक्रिया सुलभ होण्याकरीता मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात येत आहे. एकूण २९ क्षेत्रीय अधिकारी आणि ३१३ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्यामार्फत मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण काम सुरू असून येत्या १९ नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. मरकड यांनी दिली आहे.