- भाजपा हीच आपली ओळख सांगत मंत्रिपदावरून नाराज नसल्याचे चित्र
पुणे: भारतीय जनता पार्टी हीच आपली ओळख असून, मंत्रिपदापेक्षा पक्षाची संघटनशक्ती वाढवणे अधिक महत्वाचे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश झाला, की नाही याला फार महत्व नाही. भाजपाला अधिक बळकट करण्यासाठी निष्ठेने यापुढे काम करत राहणार असून, पक्षनिष्ठेला प्राधान्य असल्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, आमदार रवींद्र चव्हाण यांनी दाखवून दिले आहे.
महायुती सरकारमध्ये यावेळी मंत्रिमंडळात अनेक नविन प्रॉमिसिंग चेहऱ्यांना संधी देताना काही अनुभवी, मातब्बर नेत्यांना वगळण्यात आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २-३ दिवसांपासून नाराजीनाट्य सुरु आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीनही पक्षातील नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, छगन भुजबळ, तानाजी सावंत, नरेंद्र भोंडेकर यांच्यासह इतरांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी एकसंध असणाऱ्या महायुतीमध्ये आता मंत्रिमंडळ आणि खातेवाटपावरून भूकंप होतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. परंतु या नाराजीनाट्याला देवेंद्र फडणवीस यांचे राइट हँड रवींद्र चव्हाण अपवाद ठरले आहेत.
सरकारमधील असो किंवा पक्ष संघटनेच्या दृष्टीने, गेल्या काही वर्षांतील रवींद्र चव्हाण यांची कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयात देवेंद्र फडणवीस यांच्या खालोखाल रवींद्र चव्हाण यांचे योगदान असल्याचीही चर्चा झाली. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील चर्चेत असलेल्या नावांमध्ये चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. मुख्यमंत्रीपदी फडणवीस निश्चित झाल्यानंतर त्यांच्या ‘सुपर कॅबिनेट’ मधील एक प्रमुख नाव म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिले जात असताना त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. तरीही चव्हाण यांच्याकडून कुठल्याही प्रकारे नाराजीचा सूर उमटला नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठेची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
नागपूर येथील विधानभवन परिसर, भाजपा विधीमंडळ कार्यालय येथे अनेक मंत्री, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत रवींद्र चव्हाण अतिशय खेळीमेळीने वागत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही कोणतीही नाराजी दिसून आली नाही. अतिशय शांततेत आधीचा बायो बदलून त्याजागी ‘आमदार, डोंबिवली शहर’ इतकेच लिहिले आहे. त्यामुळेच त्यांची ही शांत, संयत भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. रवींद्र चव्हाण समर्थकांनी शांत राहण्याची घेतलेली भूमिका अधिक प्रगल्भ दिसत आहे. स्वतःसोबतच समर्थकांची समजूत काढण्यात रवींद्र चव्हाण यशस्वी ठरले आहेत. ‘भाजपा हीच माझी ओळख आहे’ असे सांगणाऱ्या चव्हाण यांच्याकडून ‘राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः’ हीच भाजपची विचारधारा पालन केली जात असल्याचे जाणकार नमूद करतात.