स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार जाहीर‌‘गानवर्धन‌’तर्फे सोमवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब कुटुंबियांचा होणार गौरव

Spread the love

पुणे : ‌‘गानवर्धन‌’तर्फे देण्यात येणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‌‘कै. सौ. स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार‌’ हरियाणातील झझ्झर घराण्यातील सात पिढ्यांची सांगीतिक परंपरा असलेल्या उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त शास्त्रीय, उपशास्त्रीय व गायन-वादनाचा ‌‘स्वरपरंपरा‌’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा सोमवार, दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे. 40 हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे वितरण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ‌‘गानवर्धन‌’चे अध्यक्ष दयानंद घोटकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
झझ्झर घराण्यामध्ये तानकप्तान उस्ताद हाफिज खाँ, बशीर खाँ, हबीब खाँ, उस्ताद रशीद खाँ अशा नामवंत गायक तसेच सारंगी आणि व्हायोलिन वादकांचा समावेश आहे. महान गायिका अंजनीबाई मालपेकर यांना उस्ताद अजीमबक्ष संगत करीत असत. तर केसरबाई केरकर यांना उस्ताद अब्दुल मजीद खाँ आणि रोशनआरा बेगम यांना उस्ताद अमीरबक्ष संगत करीत असत. नटसम्राट बालगंधर्व यांना उस्ताद मुल्लाजी कादरबक्ष आणि त्यांचे चिरंजीव उस्ताद महंमद हुसेन खाँ आणि चुलत भाऊ गफूरभाई, मुग्नी खाँ साथीला असत. तसेच महंमद खाँ यांचे शिष्य कै. पंडित मधुकर खाडिलकर, पं. मधुकर गोळवलकर, शब्बीर खाँ हेही साथसंगत करत.
उस्ताद महंमद हुसेन खाँसाहेब यांनी 1940 मध्ये पुण्यात टिळक रस्त्यावर अरुण म्युझिक क्लासची सुरुवात केली आणि अनेक कलाकार तयार केले तसेच त्यांनी ‌‘बंदिश‌’ व ‌‘उपज‌’ ही दोन स्वरचित पुस्तकेही प्रकाशित केली.
घराण्याची सांगीतिक परंपरा पुण्यामध्ये उस्ताद फैय्याजहुसेन खाँ, अन्वर हुसेन, एहजाज, अली हुसेन पुढे नेत आहेत. तर मुंबईमध्ये उस्ताद सज्जाद हुसेन, अश्फाक हुसेन यांनी सुरू ठेवली आहे.
मानाचा आणि प्रतिष्ठेचा हा पुरस्कार या पूर्वी उस्ताद उस्मान खाँ परिवार, पं. सुरेश तळवलकर, पं. अतुलकुमार उपाध्ये परिवारास प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर उस्ताद फैय्याजहुसेन परिवारातील कलाकार व शिष्य गायन-वादनाचा सांगीतिक आविष्कार सादर करणार आहेत. कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.

फोटो : उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब

प्रति,
मा. संपादक
‌‘गानवर्धन‌’तर्फे देण्यात येणारा नारायणराव टिळक पुरस्कृत ‌‘कै. सौ. स्वरगंधा टिळक स्मृती सांगीतिक कुटुंब पुरस्कार‌’ हरियाणातील झझ्झर घराण्यातील सात पिढ्यांची सांगीतिक परंपरा असलेल्या उस्ताद फैय्याज हुसेन खाँसाहेब यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती. कार्यक्रम रसिकांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.
दयानंद घोटकर, अध्यक्ष, गानवर्धन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *