पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सवात हास्य मैफलीत सादर करण्यात आलेल्या कविता, किश्यांनी हास्याचे फवारे उडाले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक येथे आडकर फौंडेशनच्या सहकार्याने हास्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. भालचंद्र कोळपकर, अनिल दीक्षित यांनी कवितांचे सादरीकरण केले. महोत्सवाचे मुख्य संयोजक विठ्ठल गायकवाड, अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कवी भालचंद्र कोळकर यांनी ‘बुलेट प्रेम’ कवितेद्वारे कॉलेजमध्ये अभ्यास सोडून प्रेम करायला गेलेल्या युवकाची कशी फजिती होती हे सांगितले. त्यानंतर काही किस्से सांगून ‘हीरोइन’ ही कविता सादर केली. या कवितेत एक युवक हिरोईनशी लग्न करण्याचं स्वप्न पाहतो आणि ते कसं भंग पावतो हे या विनोदी रचनेतून सांगितले. ‘भांडण’ या कवितेतून नवरा बायकोमधील वाद हा कसा संवादात परिवर्तित होतो आणि नवरा बायकोच्या नात्यांमध्ये भांडण कसे आवश्यक आहे हे अतिशय मजेशीररित्या सांगितले. ‘लाजरे पोरा’ या विडंबन कवितेतून आजकालची मुलं अभ्यास सोडून मोबाईलच्या नादी लागतात व पदरात अपयश पाडून घेतात त्यामुळे त्यांचे कसे हाल होतात याचे मार्मिक टिपण केले. अखेरीस ‘बाप झाल्यावर’ जबाबदारीची जाणीव करून देणारी कविता सादर केली.
अनिल दीक्षित यांनी नोट बंदीवरील विडंबन काव्याद्वारे मैफलीची सुरुवात केली. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेचं विडंबन ‘पत्रात लिव्हा’द्वारे शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यानंतर ‘अन्याय रोखण्याचा तलवार भीम माझा जखमेवरील फुंकर हळुवार भीम माझा’ ही भीमगझल सादर केली. ‘लाजू कशाला उगीच कुणाला जयभीम म्हणायला, तुझ्यामुळेच शिकलो भिमा ताठ मानेनं जगायला’ या भीम गीताने मैफलीची सांगता केली.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी रमाई महोत्सवानिमित्त आयोजित हास्य मैफल या उपक्रमाची माहिती दिली.
सचिन ईटकर म्हणाले, सर्व समाजातील घटकांना एकत्र करणारा हा रमाई महोत्सव असून दरवर्षी प्रसिद्ध व्यक्तींना या मंचावर आपली कला सादरीकरणासाठी बोलाविले जाते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले.
फोटो ओळ : भालचंद्र कोळकर आणि अनिल दीक्षित यांचा सन्मान करताना ॲड. प्रमोद आडकर, विठ्ठल गायकवाड, सचिन ईटकर.
प्रति,
मा. संपादक
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक आयोजित महामाता रमाई महोत्सवात हास्य मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
विठ्ठल गायकवाड, मुख्य संयोजक