महिलांनी स्वतःच्या मानसिक व शारिरीक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजेपुणे धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांचे मत ; पब्लिक ट्रस्ट प्राक्टिशनर्स असोसिएशन पुणे च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरीपदी नियुक्त नवोदित ११ महिला वकिलांचा सन्मान

Spread the love


पुणे : घर, संसार, करिअर सांभाळताना महिलांनी स्वतःचा स्वाभिमान देखील जपला पाहिजे. हे करीत असताना त्यांनी स्वतःच्या मानसिक व शारिरीक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. महिला भावनिकरित्या कमजोर असतात असे नेहमी बोलले जाते, परंतु मला असे वाटते की महिला भावनिक असतात पण कमजोर नसतात. जागतिक महिला दिनाचा खरा उद्देश म्हणजे महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे, असे मत पुणे विभागाच्या सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

पब्लिक ट्रस्ट प्राक्टिशनर्स असोसिएशन पुणे व धर्मादाय सह आयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरी पदी नियुक्त नवोदित ११ महिला वकिलांचा सन्मान कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी पुणे सह-धर्मदाय आयुक्त क्र. २ राहुल मामू सो, पुणे विभागाचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी महिला सशक्तीकरण वर मनोगत व्यक्त केले. तसेच, माईंड ट्रेनर संभाजी पिसाळ यांनी सर्वांना मानसिक तणाव कमी होण्याबाबत संदेश दिला.

यावेळी धर्मदाय आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी साधना जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर असोसिएशन च्या ११ नवोदित नोटरी पदी नियुक्त महिला वकिलांचा सन्मान-चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

संभाजी पिसाळ म्हणाले, दैनंदिन जीवनात काम करताना नेहमीच प्रत्येकाला ताण येत असतो. परंतु या ताणाचे रुपांतर तणावात होऊ नये, हा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. जरी हा ताण आला तरी त्याचे योग्य व्यवस्थापन केले तर ताणामुळे निर्माण होणारी अवघड परिस्थिती टाळता येईल, असेही त्यांनी सांगितले.

पीटीपीए चे अध्यक्ष ऍड. मोहन फडणीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ऍड. साधना बाजरे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. रोहिणी पवार यांनी केले, सचिव ऍड. गजानन गवई यांनी आभार मानले.

  • फोटो ओळ : पब्लिक ट्रस्ट प्राक्टिशनर्स असोसिएशन पुणे व धर्मादाय सह आयुक्त कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त नोटरी पदी नियुक्त नवोदित ११ महिला वकिलांचा सन्मान कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व महिला वकील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *