पुणे : जे काम आपण करतो ते मनापासून करा. जी जबाबदारी आपल्याला दिली आहे, ती यथायोग्य पार पडायला हवी. तर महान राष्ट्र निर्माण होण्यासोबतच महासमाधानी राष्ट्र देखील निर्माण होईल. काम करुन समाधान मिळवणे यासारखे दुसरे कोणतेही कर्तव्य नाही. महासमाधानी राष्ट्र निर्माण होण्याची आज गरज आहे, असे मत माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाशशेठ धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त सदाशिव पेठेतील गोपाळ हायस्कूल मधील गरजू विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नृत्यांगना वैष्णवी पाटील, कसबा गणपतीच्या दीपा तावरे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालीमचे प्रवीण परदेशी, तुळशीबाग गणपती मंडळाचे विकास पवार, केसरीवाडा गणपतीचे शैलेश टिळक, भाऊ रंगारी गणपतीचे संदीप जावळे, विष्णू आप्पा हरिहर, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, सतीश देसाई, गोपाळ हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील, निलेश भिंताडे, ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव उपस्थित होते.
निवृत्ती जाधव म्हणाले, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणी येतात. अनेकांना शैक्षणिक साहित्य देखील मिळत नाही. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे, आणि कोणत्याही अडचणीमुळे त्याला अडथळा ठरु नये, यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करुन विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच २५० विद्यार्थी व पालकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. कार्यक्रमात भारतीय खोखो संघाचे कर्णधार प्रतीक वायकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले, प्रशिक्षक शिरीन गोडबोले, प्राची वाईकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.