डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारानेहभप डॉ. जयवंत महाराज बोधले, डॉ. प्रकाश खांडगे यांचा होणार गौरव

Spread the love

पुणे : संत विचार प्रबोधिनी, पुणे आयोजित वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. 13 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तन सेवा पुरस्कार ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले यांना तर वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती लोककला सेवा पुरस्कार लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना प्रदान केला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.
पुरस्कार वितरण सोहळा, दि. 13 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कारांचे वितरण श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे (अयोध्या) कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, वासकर महाराज फडाचे प्रमुख ह. भ. प. राणा महाराज वासकर, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 21 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
ह. भ. प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले : श्रीक्षेत्र धामणगाव बार्शी (सोलापूर) येथील संत माणकोजी महाराज बोधले यांचे 11वे वंशज असलेले ह. भ. प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात अनेक संमेलने, मेळावे घेऊन समाजजागृती केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानदेव-तुकाराम पुरस्कार समितीवर त्यांनी विश्वस्त म्हणून कार्य केले आहे. देशाबाहेर दुबई येथे पहिले वारकरी कीर्तन करण्याचा बहुमान ह. भ. प. बोधले महाराज यांना मिळाला आहे. जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांची गाथा त्यांनी कानडी भाषेत प्रथम प्रकाशित केली आहे.
डॉ. प्रकाश खांडगे : महाराष्ट्रासह भारतातील लोककलांना विद्यापीठ तसेच केंद्र व राज्य सरकाराच्या पातळीवर सैद्धांतिक बैठक प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य करणारे व्यक्तीमत्त्व असलेल्या डॉ. प्रकाश खांडगे यांनी विद्यापीठ पातळीवर लोककलांच्या अभ्यासाची नवी पद्धती विकसित केली आहे. लोकसाहित्य, लोककलेच्या क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा व व्यासंगाचा उपयोग राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेल्या लोककलावंतांना करवून दिला आहे. केंद्र सरकारच्या संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारासह दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य सरकारच्या चार पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत.
फोटो : ह. भ. प. ॲड. डॉ. जयवंत महाराज बोधले
फोटो : डॉ. प्रकाश खांडगे
प्रति,
मा. संपादक
संत विचार प्रबोधिनी, पुणे आयोजित वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, दि. 13 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
डॉ. भावार्थ देखणे, अध्यक्ष, डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठान
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *