पिंपरी, दि. २९ जुलै २०२४ :- सर्व शैक्षणिक सुविधांसह दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महापालिका कटीबद्ध असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा परिपूर्ण लाभ मिळावा आणि शालेय साहित्याचे थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) पद्दतीने वितरण करण्यासाठी ई-रुपी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या १० दिवसात महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप महापालिकेच्या वतीने करण्यात येते. त्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा अवलंब करण्यात येते. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शालेय साहित्याचे वाटप करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धती अंतर्गत ई-रुपी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन श्रीमती लिलाबाई कांतीलाल खिंवसरा प्राथमिक विद्यालय मोहननगर, चिंचवड येथे आयुक्त शेखर सिंह यांचे हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, मुख्याध्यापक रविंद्र शिंदे, वैशाली बागलाने, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, शिक्षिका मालन वीर, स्वाती घोडके, मनीषा येणारे, रुपाली जगधने, वीणा भैरवकर, सुजाता गायकवाड, दिपाली फुंदे , प्रकाश पवार, गजराज आस्मर, मुख्य लिपिक सुभाष सदगीर, डाटा ऑपरेटर प्रियंका गावडे, यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुक्त सिंह म्हणाले, महापलिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना वितरीत केल्या जाणा-या शालेय साहित्याच्या दर्जाच्या बाबतीत तक्रारी येत होत्या. त्यावर उपाय म्हणून मागील वर्षापर्यंत शालेय साहित्याची रक्कम थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने पालकांच्या खात्यावर वितरीत केली जात होती. त्यातही त्रुटी आढळून आल्याने महापालिकेने शैक्षणिक शालेय साहित्याचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांचा परिपूर्ण लाभ मिळावा आणि या प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी थेट लाभ हस्तांतरण पद्धती अंतर्गत ई-रुपी या नवीन कार्य पद्धतीचा अवलंब केला आहे. तसेच नवीन प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व शालेय साहित्याचा दर्जा महापालिकेने तपासून घेतला असून येत्या १० दिवसात सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कशी आहे ई-रुपी प्रणाली?
थेट लाभ हस्तांतरण ई-रुपी पद्धती अंतर्गत शालेय साहित्याच्या वितरणासाठी पालकांद्वारे विद्यार्थ्याच्या संबंधित शाळेमध्ये अद्ययावत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात आली आहे. बँकेमार्फत या मोबाईल क्रमांकावर क़्यूआर कोड संबंधित लिंक असलेला संदेश पाठविण्यात येतो. या लिंकद्वारे मोबाईलमध्ये क़्यूआर कोड जनरेट करण्यात येतो. पालकांनी हा क़्यूआर कोड महापालिकेने निश्चित केलेल्या पुरवठादाराकडे सादर करायचा आहे. शालेय साहित्य पुरवठादाराकडून क़्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पालकांच्या मोबाईल क्रमांकवर ओटीपी जातो. हा ओटीपी पालकांनी पुरवठादारास सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळते.
शालेय साहित्यात कोणत्या वस्तूंचा समावेश आहे?
महापालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शालेय साहित्यामध्ये दप्तर, बुट, सॉक्स, पी.टी बुट,कंपास पेटी, फुट पट्टी, वह्या, स्वाध्यायमाला, प्रात्याक्षिक पुस्तिका, चित्रकला वही, नकाशा पुस्तिका, रेनकोट, स्टीलची पाण्याची बॉटल आदी साहित्यांचा समावेश आहे. तसेच महापालिकेने निश्चित केल्या प्रमाणे साहित्याचे वितरण व्हावे, याबाबत शालेय स्तरावर सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दक्षता घ्यावी,अशा सूचना आयुक्त सिंह यांनी केल्या.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नव्या प्रणाली अंतर्गत आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण १४० शाळांमधील एकूण ४८ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात येत असून १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यर्थ्यांना प्रत्येकी३ हजार ७०० आणि ५ वी ते १० वीच्या विद्यर्थ्यांना प्रत्येकी ३ हजार ९०० इतका खर्च ई-रुपये क़्यूआर कोड च्या माध्यमातून वितरीत करण्यात येत आहे.