पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित संगमनेरमधील सभेत, भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वसंतराव देशमुख यांचा निषेध केला जात आहे.
‘बेटी बचाव’ आणि ‘लाडकी बहीण’ चा नारा देणाऱ्या भाजपचा खरा चेहरा भाजप नेत्यांच्या विखारी वक्तव्यातून समोर आला असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. माजी खासदार सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.
वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांनी तमाम महिला भगिनींचा अपमान केला आहे. यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच सुजय विखे यांनी हे भाषण थांबवायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी आक्षेपही घेतला नाही आणि देशमुख यांचे भाषणही थांबवले नाही.
संगमनेर मधील सभेतून भाजपची आणि विखे कुटुंबाची महिलांबाबत असणारी वृत्ती आणि संस्कृती दिसून आली आहे. हीच का ‘पार्टी विथ डिफरन्स’ असेही सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे.