डॉ. कोटणीस मेमोरियल रेल्वे हॉस्पिटल, सोलापूर येथे 26 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक स्तन कर्करोग जनजागृती महिना साजरा करण्यात आला. स्तन कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे, या कर्करोगाबद्दल असलेल्या गैरसमजांना दूर करणे आणि रेल्वे कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. के. आर. चंदक (एसीएमएस/सोलापूर) यांच्या जोखीम घटकांवरील माहितीपूर्ण भाषणाने झाली. यानंतर, “कोणालाही स्तन कर्करोगाशी एकटेच सामना करावा लागू नये” या संकल्पनेवर आधारित मुख्य भाषण श्रीमती राजेश्री बिराजदार (प्रमुख फार्मासिस्ट) यांनी दिले. तसेच, डॉ. कीर्ती (स्त्रीरोग तज्ञ) यांनी लवकर निदान, प्रतिबंधक उपाय, आणि आरोग्य जागरूकतेवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहलता ओकली (सीएनएस/सोलापूर) यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
सदरच्या कार्यक्रमात डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, ओपीडीमधील महिला रुग्ण, महिला वॉर्डातील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमातून स्तन कर्करोगाबद्दलची जनजागृती, कलंक कमी करणे, मोकळ्या संवादास प्रोत्साहन देणे आणि आवश्यक समर्थन माहिती उपलब्ध करून देणे या उद्दिष्टा मध्ये यश मिळाले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक ती परवानगी व सहाय्य देणारे डॉ. आनंद कांबळे (सीएमएस/सोलापूर) यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. तसेच, कार्यक्रमाचे व्यवस्थापन अत्यंत कौशल्याने करणाऱ्या सी. व्ही. साखरे (एएनओ/सोलापूर) यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.