पुणे: भारताचा लोकप्रिय कॉमेडी पॉडकास्ट ‘तीन ताल’ येत्या १२ एप्रिल रोजी पुण्यात होणार आहे. दुसऱ्या सीझनचा १०० व्या भागात विनामूल्य सहभागी होण्याची संधी पुणेकरांना आहे. ‘तीन ताल’ची सुपरहिट तिकडी ताऊ, सरदार आणि खान चा नॉस्टॅल्जिया, बातम्या आणि सामाजिक मुद्द्यांवर आपल्या हटके शैलीत चर्चा करतात. त्यांच्या या अनोख्या अंदाजामुळेच ‘तीन ताल’ प्रचंड लोकप्रिय ठरला आहे.
पहिल्या सीझनच्या यशानंतर, या शोच्या दुसऱ्या सीझननेही १०० एपिसोड्सचा टप्पा गाठला आहे. या १०० व्या एपिसोडचा लाईव्ह शो पुण्यात होत आहे. यासाठी ‘तीन ताल’ची संपूर्ण टीम पुण्यात येत आहे. पुण्यातील महाविद्यालयात होणाऱ्या या शोमध्ये ‘तीन ताल’ टीमसोबत असंख्य ‘तीन तालिये’ (श्रोते) देखील सहभागी होणार आहे. तिखट हजरजबाबीपणा, विनोद, किस्से आणि धमाल गप्पा रंगणार आहेत.
या कार्यक्रमात शोचे तीन होस्ट कमलेश किशोर सिंह (ताऊ), कुलदीप मिश्रा (सरदार) आणि आसिफ खान (खान चा) थेट प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. ‘तीन ताल’ने राजकारण, समाज, व्हायरल ट्रेंड्स, सिनेमा आणि अनेक अनोख्या विषयांवर मिश्कील आणि परखड भाष्य करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच हा शो यूट्यूब आणि इतर पॉडकास्ट प्लॅटफॉर्म्सवर तुफान लोकप्रिय झाला आहे. भारतातील आणि परदेशातील लाखो श्रोते हा पॉडकास्ट मोठ्या आवडीने ऐकतात. मनोरंजनासोबतच नवा विचार आणि संदेश देण्याच्या खास शैलीमुळे हा शो लोकांच्या पसंतीस उतारला आहे.
‘तीन ताल’च्या सीझन-२ च्या १०० व्या एपिसोडमध्ये पुणेकरांना विनामूल्य सहभागी होता येणार आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी https://www.aajtak.in/teen-taal-registration या लिंकवर आपली नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.